मुंबई दि.४ फेब्रुवारी: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी एका विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सामान्य जनतेपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत सर्वांनाच या बातमीने जबर धक्का दिला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावरून अनेकजण आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने देखील या घटनेवर आपल्या भावना व्यक्त केल्या असून, तिला या बातमीवर अद्यापही विश्वास बसत नसल्याचे तिने सांगितले आहे.
‘अभिजात मराठी ओटीटी’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत गौतमीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या दिवशीच्या आठवणी सांगताना ती म्हणाली की, जेव्हा तिच्या आईने तिला अजितदादांच्या निधनाची बातमी सांगितली, तेव्हा तिला क्षणभर काहीच सुचले नाही. सुरुवातीला तिला आईचे बोलणे खरे वाटले नाही, तिने आईला प्रतिप्रश्न केला की ती हे काय बोलत आहे? मात्र, जेव्हा तिने स्वतः टेलिव्हिजनवर बातम्या पाहिल्या, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दादांच्या बाबतीत असे काही घडू शकते, यावर तिचा अजूनही विश्वास बसत नाहीये. ती अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही.
अजितदादांबद्दलच्या आठवणी सांगताना गौतमी म्हणाली की, तिची आणि अजितदादांची कधीही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. असे असूनही, दादांनी अनेकदा आपल्या भाषणांमध्ये तिचा उल्लेख केला होता. एका कलाकाराला एका मोठ्या नेत्याकडून मिळणारा हा पाठिंबा तिच्यासाठी खूप मोलाचा होता. काही पत्रकारांनी देखील अजितदादांना गौतमीबद्दल प्रश्न विचारले होते, त्यावेळी त्यांनी दिलेली उत्तरे आणि दाखवलेला पाठिंबा गौतमीसाठी खूप महत्त्वाचा होता. “दादांनी माझ्याबद्दल जे दोन शब्द काढले, तिथेच त्यांनी माझे मन जिंकले होते,” असे सांगताना ती भावुक झाली.
अजित पवार हे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आणि लोकप्रिय नेतृत्व होते, अशा शब्दांत गौतमीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. नियतीने जे काही केले, ते अत्यंत चुकीचे आणि मनाला चटका लावणारे आहे, असेही ती म्हणाली. कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि त्यांना हक्काने मदत करणारे नेतृत्व हरपल्याची खंत तिने व्यक्त केली. दादांनी कलाकारांना नेहमीच आधार दिला आणि त्यांचे काम मार्गी लावले. कोणाचेही काम असो, दादांकडे गेल्यावर ते १०० टक्के होणारच, अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना कधीही विसरू शकणार नाही, अशी भावना तिने व्यक्त केली.













