बारामती दि.४ फेब्रुवारी: बारामती येथील विमान दुर्घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत आता एक अत्यंत अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. विमान कोसळण्याच्या घटनेपूर्वी अवघ्या सहा मिनिटे आधी अजित पवार हे फोनवर संपर्कात होते. त्यांचा हा आयुष्यातील शेवटचा संवाद ठरला असून, बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सातव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या शेवटच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग सर्वांसमोर ठेवले.
उपलब्ध माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात श्रीजीत पवार यांनी अजित पवार यांना एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता. यामध्ये त्यांनी माळी समाजाच्या उमेदवाराला संधी मिळावी, अशी विनंती केली होती. या मेसेजची दखल घेत, विमान प्रवासात असतानाच सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजित पवार यांनी श्रीजीत यांना फोन केला. या फोन कॉलमध्ये त्यांनी आपण निवडणुकीत सर्व जाती-धर्माच्या लोकांना कशा प्रकारे सामावून घेतले आहे, याची सविस्तर माहिती दिली.
श्रीजीत पवार आणि अजित पवार यांच्यातील ‘तो’ शेवटचा संवाद:
अजित पवार: “आम्ही सुद्धा सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊनच राजकारण करतो आणि पुढे जातो.” श्रीजीत पवार: “दादा, मला त्या क्षणी जे वाटलं, ते मत मी तुमच्याकडे मांडलं.” अजित पवार: “अहो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण लक्षात घ्या, मी माळी समाजाला सुपे गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे. मुळात ती जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होती. तरीही इतर पक्षांनी तिथे वेगळे उमेदवार दिले. मात्र, आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहून त्या पद्धतीने निर्णय घेतला आहे.” श्रीजीत पवार: “ठीक आहे दादा, तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो, तो तुम्ही घ्या.” अजित पवार: “ओके.”
हा संवाद संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काळाने घाला घातला. अजित पवार यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्व समाजाला आणि घटकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जपली, असे मत श्रीजीत पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. हा ऑडिओ ऐकून उपस्थितांचे मन हेलावून गेले.













