जालना दि.४ फेब्रुवारी : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे यांचे जुने सहकारी असलेल्या अमोल खुणे यांनी जरांगे यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून, पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन जरांगे यांची नार्को टेस्ट (Narco Test) आणि एसआयटी (SIT) चौकशी करण्याची मागणी केली आहे. अमोल खुणे यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अमोल खुणे यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दावा केला आहे की, मनोज जरांगे पाटील यांचा घातपाताशी संबंध असू शकतो, त्यामुळे त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. खुणे हे एकेकाळी जरांगे यांचे सहकारी होते, मात्र आता त्यांनी जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खुणे यांनी स्पष्ट केले की, त्यांचा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही अनैतिक संबंध नाही. तसेच, ‘दादा गरुड’ यांच्या सोबतच्या ज्या कथित संभाषणाची चर्चा होत आहे, त्यात कोणत्याही प्रकारच्या ‘सुपारी’चा उल्लेख नसून, उलट दादा गरुड यांच्याकडे मनोज जरांगे यांच्या विरोधात पुरावे उपलब्ध असल्याचे खुणे यांनी म्हटले आहे.
अमोल खुणे यांनी कोपर्डी प्रकरणाचा उल्लेख करत जरांगे पाटलांवर धक्कादायक आरोप केले आहेत. खुणे यांच्या म्हणण्यानुसार, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारहाण करण्यास खुद्द मनोज जरांगे यांनीच सांगितले होते. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष कृतीची वेळ आली, तेव्हा जरांगे स्वतः घटनास्थळावरून पळून गेले. इतकेच नाही तर, “तुम्ही हे करा, मी तुम्हाला आठ दिवसांत सोडवून आणतो,” असे आश्वासन जरांगे यांनी दिले होते. परंतु, प्रत्यक्षात जरांगे हाताला खोटे प्लास्टर लावून पळाले, असा दावा खुणे यांनी केला आहे.
याव्यतिरिक्त, २०१६ सालातील एका घटनेचा उल्लेख करताना खुणे म्हणाले की, कार्यक्रमासाठी पैशांची मागणी करण्यासाठी आपण आणि मनोज जरांगे स्वतः धनंजय मुंडे यांच्याकडे गेलो होतो. या संदर्भातील पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, न्यायालयातून आपली सुटका होऊ नये, यासाठी मनोज जरांगे यांनी वकिलांना ‘मॅनेज’ केले होते, असा आरोपही खुणे यांनी केला आहे.
या प्रकरणाची जोपर्यंत निष्पक्ष चौकशी होत नाही, तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ठाम भूमिका अमोल खुणे यांनी घेतली आहे. आपल्यावर लागलेले हे डाग घेऊन आपण जगणार नाही, आणि जर न्याय मिळाला नाही, तर आत्महत्या करू, असा निर्वाणीचा इशाराही अमोल खुणे यांनी दिला आहे. जरांगे पाटील यांच्या कोणा बड्या नेत्याशी असलेल्या संबंधांमुळेच ते धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असावेत, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.













