मुंबई दि.४ फेब्रुवारी:‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आणि त्यातील हरहुन्नरी कलाकार आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत. या मंचाने अनेक कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात आणले, मात्र या कार्यक्रमाचा हुकुमी एक्का मानला जाणारा गौरव मोरे जेव्हा अचानक शोमधून बाहेर पडला, तेव्हा प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. ज्या शोने त्याला ओळख मिळवून दिली, तोच शो त्याने का सोडला? याबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. आता अखेर गौरवने स्वतः या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले असून, सिनेसृष्टीत ‘टाईपकास्ट’ होण्याच्या भीतीवर त्याने आपले परखड मत मांडले आहे.
एका मुलाखतीत मनातील खंत व्यक्त करताना गौरवने सांगितले की, त्याला एका ठराविक साच्यातील कामाचा कंटाळा येऊ लागला होता. लोक त्याला म्हणायचे की, तुमचे काम शोप्रमाणेच होतेय आणि त्याला मिळणाऱ्या भूमिकाही तशाच एकाच धाटणीच्या होत्या. दिग्दर्शक त्याला अप्रोच करताना म्हणायचे, “तुमचा रोल खूप छान आहे, तुम्ही एन्ट्री करता आणि धमाल उडवून देता.” पण यात अभिनयाला वाव मिळण्यापेक्षा केवळ कॉमेडी करण्याचा आग्रह जास्त असायचा. चित्रपटामध्येही हिरो-हिरोईनच्या मध्ये येऊन केवळ विनोद निर्मिती करणे, हेच वारंवार होऊ लागले होते. या एकसुरी कामामुळे त्याला आपण ‘ब्रेक’ घ्यायला हवा, असे प्रकर्षाने वाटले. त्यामुळेच त्याने काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत त्याने वर्षभर कोणतेही काम स्वीकारले नाही, केवळ हिंदीतील ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोचे काही एपिसोड्स केले, कारण त्याला हिंदी भाषेत काम करण्याचा अनुभव घ्यायचा होता.
या मुलाखतीत गौरवला त्याचा जवळचा मित्र आणि सहकलाकार ओंकार भोजने याच्याबद्दल विचारले असता, त्याने ओंकारवर कौतुकाचा वर्षाव केला. “ओंकार हा खऱ्या अर्थाने एक हिरा आहे. सध्याच्या घडीला त्याच्यासारखा कसलेला आणि ताकदीचा अभिनेता दुसरा कोणीही नाही,” अशा शब्दांत गौरवने त्याच्या अभिनयाचा गौरव केला. एवढेच नव्हे तर, “पुढील १०-१५ वर्षे तरी ओंकारच्या तोडीचा अभिनेता इंडस्ट्रीत येणार नाही,” असे भाकीतही त्याने वर्तवले. यावरून या दोन कलाकारांमधील निखळ मैत्री आणि एकमेकांच्या कलेविषयीचा आदर स्पष्ट दिसून येतो.
गौरव मोरेला केवळ एक विनोदी अभिनेता म्हणून स्वतःला मर्यादित ठेवायचे नाही. आपल्या भविष्यातील महत्त्वाकांक्षेबद्दल बोलताना त्याने सांगितले की, त्याला अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार (नॅशनल अवॉर्ड) मिळवायचा आहे. “तो सन्मान प्राप्त करून त्याचा फोटो मला घरात लावायचा आहे. भविष्यात जर कोणी मला विचारले की, तू आयुष्यात काय कमावलंस? तर त्या फोटोकडे बोट दाखवून मी अभिमानाने सांगेन की, ही माझी कमाई आहे,” असे गौरवने अतिशय आत्मविश्वासाने सांगितले.













