कुणाल कामरा–सुषमा अंधारेंना विधान परिषदेचे समन्स
मुंबई दि.४ फेब्रुवारी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विडंबनात्मक नक्कल करणं कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंना चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीने दोघांनाही समन्स बजावले असून ५ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेपुढे प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कुणाल कामरा यांनी त्यांच्या एका स्टँडअप शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली उपरोधिक टीका आणि नक्कल वादाचा विषय ठरली होती. त्याचवेळी सुषमा अंधारेंनी या प्रकरणावर सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांमुळे सत्ताधारी आघाडी आक्रमक झाली होती. या दोन्ही बाबी विधान परिषदेच्या विशेषाधिकारांचा भंग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी या वक्तव्यांमुळे सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचा दावा केला आहे. त्यानंतर अध्यक्षांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीनंतर समितीने कामरा आणि अंधारेंना समन्स बजावण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या कारवाईवरून राजकीय वातावरण तापलं असून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी या समन्सवर टीका करत सत्ताधाऱ्यांवर दडपशाहीचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी गटाने विधानमंडळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे.
५ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, या प्रकरणातून राजकीय आणि कायदेशीर वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












