मुंबई दि.७ फेब्रुवारी: पुणे आणि बारामती परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच कर्जमाफीबाबत एकमताने निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सध्या वेगाने हालचाली सुरू असून, माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे.
या प्रक्रियेसाठी परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे. त्यानंतर माहिती संकलनाचे काम पूर्ण होऊन, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आगामी अर्थसंकल्पात या संदर्भात काही मर्यादित तरतूद होण्याची शक्यता असली, तरी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द नक्कीच पाळला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भरणे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे पक्षात आणि राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळावी, अशी अनेक आमदारांची भावना आहे. मात्र, सध्या पवार कुटुंब दुःखात असल्याने तेरा दिवसांचा दुखवटा पूर्ण झाल्यानंतरच सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील. आपण स्वतः सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले असून, या भेटीत केवळ सांत्वन करण्यात आले, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इंदापूर तालुक्याच्या राजकारणाविषयी बोलताना भरणे यांनी सांगितले की, येथील जनता अत्यंत सुज्ञ आहे आणि ती केवळ प्रचारसभा किंवा भाषणांना भुलत नाही. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावर उभे राहिलेले सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.













