अकोला दि.८ फेब्रुवारी: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघाताबाबत समोर येत असलेल्या प्राथमिक चौकशी अहवालांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांनी तीव्र असमाधान व्यक्त केले आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताच्या तपासावर आणि समोर येणाऱ्या माहितीवर संशय व्यक्त करत राज्य सरकारकडे ठोस पुराव्यांची मागणी केली आहे. अजित पवार हे राज्याचे महत्त्वाचे नेतृत्व होते आणि त्यांची सुरक्षा ही सामान्य बाब नव्हती, असे सांगत मिटकरी यांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तातडीने सार्वजनिक करावे, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे.
अकोला येथे माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी विमान दुर्घटनेच्या तपासावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, अजितदादांच्या हेलिकॉप्टर/विमान अपघाताबाबत सध्या जी माहिती समोर येत आहे, ती केवळ वेळ मारून नेणारी आणि ‘थातूर-मातूर’ स्वरूपाची वाटत आहे. तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक असे साधे कारण देऊन ही घटना पचवणे जनतेला मान्य होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमागचे सत्य जाणून घेण्यासाठी पुराव्याची वाट पाहत आहे. त्यामुळे अजित पवार विमानतळावर आल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाने जनतेसमोर मांडावे, म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुरावा मिळेल.
यावेळी मिटकरी यांनी काही स्पेसिफिक आणि अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. ते विचारतात की, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या प्रवासासाठी ज्या विमानाची निवड करण्यात आली, ती कोणी आणि कोणत्या निकषांवर केली होती? ज्या विमानाला अपघात आणि सुरक्षा दोषांचा इतिहास होता, तेच विमान का वापरले गेले? तसेच, ऐनवेळी वैमानिक का बदलण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत. घटनास्थळी विमानाचा किंवा कागदाचा एखादाही जळालेला तुकडा का दिसत नाही आणि प्रवासी यादीतील नोंदींमध्ये विसंगती का आढळत आहे, असे अनेक तर्कशुद्ध प्रश्न त्यांनी उपस्थित केले असून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेनंतर केलेल्या वक्तव्याचाही अमोल मिटकरी यांनी खरपूस समाचार घेतला. अशा दुःखाच्या प्रसंगी आणि राज्यावर शोककळा पसरलेली असताना दमानिया यांनी केलेली विधाने अत्यंत असंवेदनशील आणि दुर्दैवी आहेत, अशी टीका मिटकरींनी केली. केवळ राजकीय हेतूने संशय निर्माण करणे आणि तथ्यहीन आरोप करणे हे माणुसकीला धरून नाही. अशा कठीण काळात दुःखात सहभागी होण्याऐवजी वातावरण दूषित करणे चुकीचे असून त्यांच्या या भूमिकेचा आपण तीव्र निषेध करतो, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य हळहळत असताना, या अपघाताचे गूढ उकलण्यासाठी पारदर्शक तपास होणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.













