तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!

तामसा पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धाडसी कारवाई करत कोपरा शिवारात छापा टाकून जवळपास दीड लाखाचा गुटख्याचा साठा आणि पाच लाखाचे एक स्कॉर्पिओ वाहन जप्त केले आहे. सदरील घटना सोमवारी दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अवैधरित्या गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तामसा पोलिसांनी कोपरा शिवारात युनूस सादिक शेख यांच्या आखाड्यावर ठेवलेला गुटखा, पान मसाला स्कॉपिओ वाहनामध्ये नेत असताना तामसा पोलिसांची गाडी पाहून तो पसार झाला. कोपरा शिवारात संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा साठयासह स्कॉर्पिओ वाहन जप्त करून तामसा पोलीस ठाणे या ठिकाणी आणले.
या प्रकरणी जवळपास दीड लाख रुपयांचा विविध कंपनीचा अवैध गुटखा,पान मसाला तसेच ५ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ गाडी तामसा पोलीसांनी जप्त केली आहे. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. गाडीचा मालक समीर खान पठाण या व्यक्तीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तामसा पोलीस करत आहेत. या कार्यवाहीत स.पो.नी. बालाजी नरवटे, अशोक सिंगणवाड, श्याम नागरगोजे, चालक कदम आदींनी सहभाग घेतला.
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##









