तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन मस्के नाईक (पळसेकर) यांच्या संकल्पनेतून पळसा सर्कलमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची सुरुवात 19 जून रोजी चिंचगव्हाण येथून झाली. त्यानंतर माळझरा, कारला, खरबी, केदारनाथ, चेंडकापूर व कवाना येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी वापरण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा ठरत आहे.
चेंडकापूर व कवाना येथे झालेल्या साहित्य वितरण कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गजानन मस्के नाईक ( पळसेकर) यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र स्वागत होत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. वाढदिवस साजरा करण्याची सकारात्मक दिशा दाखविणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
सत्यप्रभा न्यूज नांदेड





















