मुंबई : महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरातसोबत (Ashok kharat) आर्थिक व्यवहारात संबंध आहेत का, तसेच त्यांच्याशी असलेल्या जवळीवरुन आधी एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची तब्बल 6 तास चौकशी केली होती. त्यानंतर, आता अशोक खरातच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांना चौकशीसाठी बोलवले होते. त्यासाठी, रूपाली चाकणकर सकाळी 10.30 वाजतात वरळी ED झोन (ED) 2 च्या ऑफिसमध्ये दाखल झाल्या होत्या. ईडीकडून आजही जवळपास त्यांची 6 तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, अशोक खरातसोबतच्या गुवाहटी दौऱ्यासंदर्भाने भाष्य केलं.
भोंदूबाबा अशोक खरातने दैवी शक्ती आणि काळ्या जादूचा धाक दाखवून अनेकांकडून गैरमार्गाने पैस, खंडणी उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत, त्याने अनेक बेनामी अकाउंटच्या माध्यमातूनही गैरव्यवहार, उलाढाल केली आहे. विशेष म्हणजे, खरातची ही उलाढाल 70 कोटींहून अधिकची असून त्यामुळे ED ने यात मनी लाँड्रिंग अंतर्गत आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. रूपाली चाकणकर या अशोक खरातच्या निकटवर्तीय मानल्या जातात, या सगळ्यात रुपाली चाकणकर यांचा देखील सहभाग आहे का? याची चौकशी सध्या ED कडून सुरू आहे. त्याचसाठी, आज मुंबईतील कार्यालयात त्या आल्या होत्या.
रुपाली चाकणकर यांनी ईडी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधला, ईडीने चौकशिला बोलवलं तेव्हा मी आले आहे, अनेक बातम्यामधून विपर्यास केला गेला आहे. आज जबाब नोंदवूनन टाईप करणे यासाठी खूप वेळ लागला. खरात प्रकरणात माझा कोणताही संबंध नव्हता आणि नाही, असे रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. ईडीने मला आज काय प्रश्न विचारले होते ते लवकरच अहवालातून समोर येईल, तेव्हा सर्व गोष्टी बाहेर येतील. इथून पुढेही मी तपासाला सहकार्य करेन. अशोक खरातकडून जी खाती बनवली गेली ती बनावट होती, समता पतसंस्थेशी माझ्या बहिणीचा संबंध नाही, असेही चाकणकर यांनी यावेळी सांगितलं.