शौचालयातील दुर्गंधीमुळे नागरिकांची पळता भुई थोडी; भिंतीवर रंगल्या ‘गुटख्याच्या रांगोळ्या’
तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
सामान्य नागरिकांच्या कामाचे आणि तालुक्याच्या विकासाचे केंद्र असलेल्या हादगाव पंचायत समिती कार्यालयाला सध्या घाणीच्या विळख्याने ग्रासले आहे. कार्यालयाच्या आवारात आणि विशेषतः शौचालयांमध्ये पसरलेल्या प्रचंड घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून फिरावे लागत आहे. शौचालयातील असह्य दुर्गंधीमुळे नागरिक दुरूनच पळ काढत असल्याचे चित्र असून, ‘स्वच्छ भारत अभियानाचा’ येथे पुरता बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
गुटखा बंदी फक्त कागदावरच?
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री आणि सेवनावर कडक बंदी असताना, हादगाव पंचायत समितीच्या भिंती मात्र काही वेगळीच कहाणी सांगत आहेत. शासकीय कार्यालयाच्या भिंतीवर तंबाखू आणि गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून ठिकठिकाणी ‘रांगोळ्या’ उमटवल्या गेल्या आहेत. हे कृत्य करणाऱ्यांना आणि प्रशासनाला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. बंदी असलेला गुटखा थेट पंचायत समितीच्या आवारात पोहोचतोच कसा, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
गटविकास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
दररोज शेकडो नागरिक आपल्या विविध कामांसाठी तालुक्यातून या ठिकाणी येतात. मात्र, येथील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासकीय यंत्रणा जनतेला स्वच्छतेचे धडे देत असताना, स्वतःच्याच कार्यालयातील स्वच्छतेकडे मात्र डोळेझाक केली जात आहे.नागरिकांचा संतप्त सवाल:
अशा घाणीच्या साम्राज्यात आणि दुर्गंधीत नागरिकांनी बसायचे कुठे? गुटखा खाणारे आणि घाण करणाऱ्यांवर प्रशासन दंडात्मक कारवाई का करत नाही? वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का?”
या प्रकरणी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून स्वच्छता करावी आणि कार्यालयात गुटखा खाऊन भिंती रंगवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी हादगाव तालुक्यातील जनतेतून होत आहे.
सत्यप्रभा न्यूज नांदेड






















