Political News : स्टार्मर यांच्या राजीनाम्याच्या चर्चेमुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार्मर यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे पंतप्रधानपद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. एका कॅबिनेट मंत्र्यानेही स्टार्मर राजीनामा (Political News ) देण्याची शक्यता व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
ब्रिटनमध्ये सध्या लेबर सरकारविरोधात नाराजी वाढताना दिसत आहे. प्रशासनाच्या निर्णयांवरून सरकारवर सातत्याने टीका होत असून, काही वादग्रस्त नियुक्त्या आणि स्थानिक निवडणुकांमधील खराब कामगिरीमुळे सरकारचं टेन्शन वाढलं आहे. विशेषतः पीटर मँडेलन यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादामुळे लेबर पक्ष अडचणीत आला आहे. (britain pm Keir starmer)
दरम्यान, स्टार्मर यांच्या मंत्रिमंडळातील माजी आरोग्य सचिव वेस स्ट्रिटिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकारला मोठा धक्का बसला. स्ट्रीटिंग यांनी उघडपणे स्टार्मर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भविष्यात पक्ष नेतृत्वासाठी आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, “पद सोडण्यासाठी वेळ निश्चित करा,” असा थेट सल्लाही त्यांनी स्टार्मर यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.
ब्रिटनच्या राजकारणात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे स्टार्मर यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. एका सर्व्हेनुसार, तब्बल ६९ टक्के नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी नाराजी आहे. त्यामुळे स्टार्मर हे ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही विश्लेषकांनी तर त्यांची तुलना लिझ ट्रस यांच्या अल्पकालीन कार्यकाळाशीही केली आहे.
विशेष म्हणजे, स्टार्मर यांच्या स्वतःच्या पक्षातही त्यांच्या नेतृत्वाबाबत अस्वस्थता वाढत असल्याचं बोललं जात आहे. वाढती नाराजी आणि घटती लोकप्रियता यामुळे भविष्यात लेबर पक्षाच्या सत्तेच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.