Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची काल भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आलं.
काल (29 मे) दीड तास राधाकृष्ण विखे पाटलांकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. जरांगेंनी हैदराबाद गॅझेटसह कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून विखेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे जरांगे आजपासून उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारला आता वेळ देणार नसल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलं. आज सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
मनोज जरांगे यांच्या 10 मागण्या काय? (Manoj Jarange Patil Demands)
1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या. 2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा. 3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या. 4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा. 5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा. 6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे. 7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या. 8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा. 9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा. 10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून आंदोलन सुरू होतं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज यांच्या चरणी उभे राहून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन व्यक्त करताना, सातारा गॅझेटप्रमाणेच कोल्हापूर गॅझेटचाही आरक्षण प्रक्रियेत विचार करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे.