नांदेड दि. 30 मे
पोलीस प्रशासनातील पारदर्शकता वाढवून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवारचे शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी यांनी निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर फीडबॅक प्रणाली सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनेक वेळा नागरिकांकडून गुन्हा नोंदविण्यासाठी किंवा तक्रारीवर कारवाई करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी समोर येतात. यामुळे सामान्य नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रस्तावित प्रणालीअंतर्गत प्रत्येक एफआयआर किंवा तक्रार नोंद झाल्यानंतर 24 ते 48 तासांच्या आत पोलीस अधीक्षक कार्यालयातून फिर्यादीशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पोलीस ठाण्यातील वागणूक, कोणत्याही प्रकारची पैशांची मागणी, कामकाजाबाबतच्या तक्रारी अथवा सूचना आणि पोलीस सेवेबाबतचे समाधान याविषयी माहिती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनातील पारदर्शकता वाढून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल. तसेच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे फैसल सिद्दीकी यांनी सांगितले. हा उपक्रम नांदेड जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवून राज्यासाठी आदर्श मॉडेल निर्माण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देताना मोहम्मद अरसलान, शेख नजीब हे उपस्थित होते.






















