महाराष्ट्र दि.०१ जून : कौटुंबिक नाती आणि राजकीय समीकरणे यांचा एक अनोखा संगम सध्या महाराष्ट्रच्या राजकीय पटलावर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. नागपूर येथील नामांकित उद्योजक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र, या कौटुंबिक सोयरिकीसोबतच राजकीय वर्तुळात एका वेगळ्या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) कडून अरुण लखानी यांना आगामी विधान परिषद निवडणूक रिंगणात उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण लखानी हे केवळ एक यशस्वी व्यावसायिक नसून ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत सह-कोषाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. तसेच ते पायाभूत सुविधा क्षेत्रातील विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष म्हणूनही ओळखले जातात. राजकीय वर्तुळात ते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. आता पक्षाने त्यांना थेट विधान परिषद मध्ये संधी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला पवार कुटुंबाशी जोडले जाणारे नाते आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडून मिळालेले उमेदवारीचे तिकीट, यामुळे राजकीय विश्लेषकांचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले आहे.
काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे, रेवती सुळे आणि सारंग लखानी यांनी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी पंतप्रधान यांना लग्नाचे रीतसर निमंत्रण दिले. या महत्त्वपूर्ण भेटीनंतरच अरुण लखानी यांच्या संभाव्य राजकीय वाटचालीबद्दल आणि उमेदवारीबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात होते. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या उमेदवारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. सध्याचे राजकारण हे सामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हाताबाहेर गेले असून, ही थेट १०० कोटी रुपयांची निवडणूक झाली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे या निवडणुकीत मोठा रंगतदार सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, महाराष्ट्रच्या राजकारणात पक्षापलीकडील कौटुंबिक संबंध आणि राजकीय विचार यांचा मेळ कायमच पाहायला मिळतो. अरुण लखानी यांची ही उमेदवारी याच राजकीय परंपरेचा एक नवा अध्याय ठरू शकतो. आगामी काळात या मतदारसंघातील प्रत्यक्ष लढत नक्कीच लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.





















