जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहिद्दीन शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरखेड ते कवडगाव रस्त्याच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा उभा केला आहे. ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांनी पिंपरखेड येथील विंचरणा नदीच्या पात्रात आंदोलन देखील केले होते. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री सडक योजनेतून पिंपरखेड ते कवडगाव रस्त्याचे काम मंजूर होऊन पूर्णत्वाकडे गेले आहे. मात्र, विंचरणा नदीवर पूल नसल्याने या रस्त्याचा फायदा आजही दोन्ही गावांतील नागरिक आणि शेतकऱ्यांना होत नाही.
याबाबत मोहिद्दीन शेख यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे विंचरणा नदीवरील पुलाचे काम तातडीने मंजूर करून मार्चच्या आराखड्यात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
२०१७ पासून या पुलासाठी सातत्याने अर्ज, निवेदने आणि आंदोलने करण्यात आली असूनही आजपर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही. पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील लोकसंख्या सुमारे ७०० च्या आसपास आहे. मात्र, नदीवर पूल नसल्यामुळे गावात येण्यासाठी नागरिकांना नदीच्या कडेकडेने, ओढे-नाल्यांतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
चारचाकी वाहने सहा ते सात महिने गावात पोहोचू शकत नाहीत. शेतमाल वाहतूक, दवाखान्यात जाणे, लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती महिला यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा पाहुण्यांच्या मदतीने गर्भवती महिलांना घरीच ठेवावे लागते. अशा अनेक गंभीर समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
ग्रामस्थांनी यासाठी अनेकदा उपोषण, आंदोलन आणि निवेदने दिली. मात्र, पुलासाठीचा खर्च जास्त असल्याचे कारण देत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मोहिद्दीन शेख यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनाने पिंपरखेड – कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीवरील पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा,” अशी नम्र विनंती आंदोलक मोहिद्दीन हुसेन शेख (रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी केली आहे.