नांदेड, दि. १ जून :
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांसाठी दरवर्षी राखीव असलेला आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी खर्च करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या वर्षी जून महिन्यात आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर अर्धनग्न अवस्थेत भिक मागो आंदोलन व आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत आमदारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, त्या आश्वासनाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले असतानाही मतदारसंघातील दिव्यांगांसाठी राखीव निधीचा अपेक्षित वापर झालेला दिसून येत नसल्याने दिव्यांग समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
आज आमदारांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात असताना, वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चातून मतदारसंघातील गरजू दिव्यांगांना इलेक्ट्रिक स्कुटी, व्हीलचेअर, ट्रायसायकल, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, शैक्षणिक साहित्य तसेच रोजगाराभिमुख साधनसामग्रीचे वितरण करण्यात आले असते तर हजारो दिव्यांग कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला असता आणि त्यांचे आशीर्वाद मिळाले असते, अशी भावना व्यक्त होत आहे.
दिव्यांगांच्या नावाने राखीव असलेला निधी प्रत्यक्ष दिव्यांगांच्या कल्याणासाठी वापरणे ही लोकप्रतिनिधींची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील दिव्यांगांसाठी राखीव निधी तात्काळ खर्च करून त्याचा तपशील सार्वजनिक करावा व पात्र दिव्यांगांना लाभ वितरित करावेत, अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
दिव्यांग समाजाला आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असून, वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे निर्णय अधिक महत्त्वाचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!





















