नांदेड दि.२७ जून : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या निरोप समारंभासह नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी सकल दिव्यांग संघटनेचे सुमारे २५ ते ३० दिव्यांग बांधव मावळते व नवनियुक्त पोलीस अधीक्षकांचा सत्कार करण्यासाठी शाल, श्रीफळ, पेढे व पुष्पगुच्छ घेऊन सकाळपासून उपस्थित होते. दिव्यांग बांधव तळमजल्यावरील लिफ्टजवळ प्रतीक्षा करत असल्याची माहिती आयोजकांना तोंडी तसेच लेखी स्वरूपात देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांना जवळपास चार तास उपाशीपोटी थांबावे लागले. एवढेच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, उपाशीपोटी असल्याने कार्तिक कुमार भरतीपुरम या दिव्यांग युवकाला अचानक चक्कर येऊन तो खाली कोसळला. यावेळी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या समवेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ धाव घेत त्याला गर्दीतून बाहेर काढले. त्याचवेळी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्याकडे धाव घेत वाहनाची मागणी केली. आंबेकर यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी दिव्यांगाला शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे उपचारासाठी पाठविले. पडल्यामुळे त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून प्रकृती स्थिर आहे.
यानंतर मावळते पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिव्यांगांसोबत खाली बसून सत्कार स्वीकारला, संवाद साधला व छायाचित्रे काढली. विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनीही प्रत्येक दिव्यांगाची भेट घेऊन पुष्पगुच्छ स्वीकारले आणि सर्वांसोबत छायाचित्रे काढत आत्मीयतेने संवाद साधला.
याबाबत राहुल साळवे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या तत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. तसेच भविष्यात अशा शासकीय कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उपस्थित दिव्यांग बांधवांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की, शासकीय कार्यक्रम असूनही नियोजन आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने कार्यक्रमाची व्यवस्था अपेक्षेप्रमाणे वाटली नाही.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!






















