Sudarshan Ghule threatened to kill Mahadev Gitte : बीडमधील गुंडांच्या टोळ्या जेलमध्ये कैद असल्या तरी त्यांची गुंडगिरी काही कमी होताना दिसत नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी सुदर्शन घुलेने महादेव गित्तेला जेलमध्येच धमकी दिल्याची माहिती महादेव गित्तेच्या पत्नीने दिली आहे. महादेव गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे.
बीडमधील गुंडांच्या जंगलराजच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. यातील काही टोळ्या या जेलमध्ये कैद आहेत. आता जैलमध्ये कैद असलेल्या या टोळ्यांमध्येही राडा होताना दिसतो आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या सुदर्शन घुलेने महादेव गित्तेला जेलमध्ये धमकी दिली आहे.
तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात. बाहेर भेटला असता तर सरपंच संतोष देशमुख पेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन घुले याने महादेव गित्तेला दिल्याचा आरोप महादेव गित्तेच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी महादेव गित्तेच्या पत्नीने बीडच्या पोलीस अधिक्षकांचीही भेट घेतली. महादेव गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे.
महादेव गित्तेसोबत जेलमध्ये असलेल्या राजेश नेहरकर यांनीही जेलमध्ये आपल्याला मारहाण झाल्याचं फोनकरून सांगितलं होतं अशी माहिती राजेश नेहरकरच्या पत्नीने दिली आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून ही मारहाण झाल्याचा आरोपही महादेव गिते आणि राजेश नेहरकरच्या पत्नींनी केला आहे.
जेलबाहेर असताना संपूर्ण बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडची दहशत होती. मात्र महादेव गितेच्या पत्नीने केलेल्या आरोपांनतर जेलमध्येही वाल्मिक कराडची दहशत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जर असं असेल तर जेल प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल.