“पशुसंवर्धन विभाग, पोलीस प्रशासन, स्वंयसेवी संस्था व सामाजिक संघटनांची उपस्थिती”
नांदेड दि.१३: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात बकरी ईद साजरी केली जाणार असल्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत दिनांक १२.०६.२०२४ रोजी बैठक पार पडली. बकरी ईद निमित्त शहरातील मुस्लीम बांधव दिनांक १७.०६.२०२४ ते १९.०६.२०२४ या कालावधीत कुर्बानी देणार असल्याने त्यापार्श्वभुमीवर करावयाच्या उपाययोजने संदर्भात आयुक्तांनी या बैठकीत आढावा घेतला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त स.अजितपालसिंघ संघु, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रईसादीन, शहर अभियंता दिलीप आरसुडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, कार्यकारी अभियंता सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त संजय जाधव, मो.गुलाम सादेक, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, निलावती डावरे यांची उपस्थिती होती. तसेच या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.प्रविणकुमार घोले, डॉ.संजय रोडे, पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, श्याम टाक, रामदास शेंडगे, पी. बी. कदम, तसेच विविध सामाजिक व स्वंयसेवी संस्थे प्रतिनिधी, शहरातील मौलवी, मौलाना, कुरेशी यांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात योग्य पध्दतीने कुर्बानी पार पाडावी व त्यानंतर निर्माण होणाऱ्या टाकाऊ पदार्थांची योग्यप्रकारे विल्हेवाट करण्याकरीता संपुर्ण राज्यात सुधारीत गोवंश हत्याबंदी व प्राणी सरंक्षण कायदा १९७६ (सुधारीत) लागु असल्याने यातील नियम व अटीच्या अधिन राहुन तात्पुरत्या स्वरुपात तीन दिवसांकरीता कत्तलखाने उभारण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
तसेच महानगरपालिकेच्या वतीने या कालावधीत शहरात तीन दिवस नियमित पाणी पुरवठा करून शहरात या कालावधीत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यासंदर्भात आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्याऱ्यांना बैठकी दरम्यान सुचित केले आहे. तसेच भांडार विभागा मार्फत पशुसाठी खाद्य व टाकाऊ पदार्थ उचलण्यासाठी नागरीकांना बारदाने निशुल्क वाटप करुन कुर्बानीच्या ठिकाणी जंतुनाशक पावडरांची फवारणी करण्यात यावी असे आदेश आयुक्तांनी संबंधीत विभाग प्रमुखांना बैठकीत दिले आहेत.
शहरातील तात्पुरत्या कत्तलखान्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभागा मार्फत तपासणी प्रमाणपत्र (Antimortem Certificate) देण्याकरीता पशुधन विकास अधिकारी व मनपा स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असुन शहरातील तात्पुरत्या कत्तलखान्याच्या ठिकाणाहुन टाकाऊ पदार्थ उचलण्याकरीता विशेष झाकणरहीत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डंम्पींग ग्राऊंड तुप्पा येथे या टाकाऊ पदार्थाची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे बैठकीदरम्यान आयुक्तांनी सांगितले.
शहरात मुस्लीम बांधवांनी बकरी ईद सामाजिक सौहदार्य राखत साजरी करुन शहरातील स्वच्छता कायम ठेऊन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













