मुंबई दि.६ फेब्रुवारी : “एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र, जर बसेस वेळेवर धावल्या नाहीत, तर प्रवासी खासगी पर्यायांकडे वळतात. त्यामुळे एसटी महामंडळाने वक्तशीरपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. बसेस वेळेवर धावल्या तरच महसुलाची चाके वेगाने फिरतील,” अशा स्पष्ट शब्दांत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाची कानउघडणी केली.
मंत्रालयात आयोजित एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करत अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.
भाडेवाढीचा प्रस्ताव फेटाळला इंधन आणि सुटे भागांच्या वाढत्या किमतींचे कारण देत महामंडळाने यंदाही २ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, मंत्री सरनाईक यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. “गेल्या वर्षी आधीच मोठी भाडेवाढ करण्यात आली होती, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत पुन्हा भाडेवाढ करण्याऐवजी सेवा सुधारण्यावर भर द्या. प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध करून दिली, तरच ते एसटीकडे पुन्हा वळतील,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
वक्तशीरपणा हीच नवी ओळख हवी दैनंदिन प्रवासात बसेस उशिरा सुटणे, रस्त्यात नादुरुस्त होणे किंवा ऐनवेळी फेऱ्या रद्द होणे अशा तक्रारींचा पाऊस पडत असल्याबद्दल सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आगार पातळीवरील अधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून प्रत्येक फेरी नियोजित वेळेत सुटेल याची खात्री करावी, असे आदेश त्यांनी दिले. “वक्तशीर सेवा हेच उत्पन्न वाढीचे सूत्र आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
https://youtu.be/fnzR0be5jMs?si=HLs0zNzDa6emQqOU
८००० नवीन बसेस आणि आधुनिकीकरण एसटीच्या ताफ्यात २०२६ अखेरपर्यंत ८००० नवीन बसेस दाखल करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. निविदा प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. केवळ नवीन बसेस नाही, तर बसस्थानकांचे नूतनीकरण, महिलांसाठी स्वच्छतागृहे आणि ‘स्मार्ट’ बस सेवा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वक्तशीरपणा, सुरक्षित प्रवास आणि काटकसरीचे धोरण राबवून एसटी महामंडळाला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच पुढील वाटचालीचा मंत्र असल्याचे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले..













