विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.३: फटाके फोडण्यावरून हाणामारी होऊन दोन्ही गट वाळूज पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यासाठी आले. पोलीस ठाण्यासमोर पुन्हा या दोन्ही गटांत दगडफेक सुरू झाली. पोलिसांनाही ते जुमानत नव्हते. त्यामुळे एकच गोंधळ उडून अफवा पसरल्यामुळे व्यावसायिकांनी झटपट दुकाने बंद केली. हा प्रकार शुक्रवारी (१ नोव्हेंबर) रात्री १० ते साडेदहाच्या सुमारास वाळूजमध्ये घडला.
या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटांतील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या गटातील सलमान खान, जुबेर पठाण, अमीर पठाण, इम्रान पठाण, उमेर सय्यद, अशपाक पटेल तर दुसऱ्या गटातील संतोष परसराम प्रधान, अजय नवनाथ दुसिंग, कृष्णा बोरकर, किरण पंडीत, संतोष मुरलीधर जमधडे, कृष्णा जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक जलील खान हबीबखान पठाण यांनी तक्रार दिली आहे.
नक्की काय घडले?
शुक्रवारी रात्री दहाला संतोष प्रधान व अजय दुसिंग (रा. साठेनगर, वाळूज) हे पोलीस ठाण्यात आले. त्यांनी सांगितले, की साठेनगर येथील मारोती मंदिराच्या मोकळ्या जागेत दिवाळी सणानिमित्त फटाके फोडत असताना सलमान खान, जुबेर पठाण, अमीर पठाण, इम्रान पठाण, उमेर सय्यद, अशपाक पटेल (रा. साठेनगर) हे आले. त्यांनी इथे फटाके का फोडता असे म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचवेळी प्रधान आणि दुसिंग यांचे २० ते २५ समर्थक पोलीस ठाण्यासमोर आले. हा जमाव जमलेला असतानाच दुसऱ्या गटातील सलमान खान, जुबेर पठाण, सय्यद पठाण, उमेर सय्यद, अशपाक पटेल व त्यांचे २० ते २५ समर्थक पोलीस ठाण्यासमोर आले. त्यांनीही संतोष प्रधान व त्यांचे सहकारी आमच्या घरासमोर फटाके फोडत होते म्हणून आम्ही त्यांना समजविण्यास गेलाे असता त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, असे सांगितले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर