Chandrashekhar Bawankule News : भाजपात तिकीट मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे, पण तिकीट जाहीर झाल्यानंतर कोणी बंडखोरी करेल अशी परिस्थिती भाजपात नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, पुण्यात बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शाळा घेतलीयं. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीला भाजपचे नेते अमोल बालवडकर, श्रीनाथ भिमाले यांनी दांडी मारल्याने एकच चर्चा सुरु झाल.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये आधी देश नंतर पक्ष या भूमिकेत आम्ही आहोत. पक्ष हा आईसारखा असून पक्षात कोणाही बंडखोरी करीत नाहीत. आम्ही सर्वांनाच पक्षात काही ना काही जबाबदारी देऊन स्थान देतो आहोत. त्यामुळे कुठेही बंडखोरी होणार नसून एकही कार्यकर्ता पक्षाविरोधात जाणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय.
उमेदवारी जाहीर झाल्यातर सर्वच कार्यकर्ते महायुतीचंच काम करणार आहेत, सध्या महायुतीमध्ये अजित पवार गट, शिवसेना आणि भाजपसह मित्रपक्ष आहेत. त्यामुळे कोणत्याही मुद्द्यावरुन महायुतीविरोधात उमेदवार बंड करेल अशी परिस्थिती नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.
पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांची शाळा घेतलीय. यावेळी बंडखोरी उमेदवारांची बावनकुळे यांनी समजूत काढल्याची चर्चा सुरु आहे. उमेदवार यादी घोषित होण्याआधीच बावनकुळेंकडून जोरदार हालचाली सुरु असून पक्षाकडून जाहीर केलेल्या उमेदवाराचं काम करण्याच्या सूचना यावेळी बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.