
दाऊ गाडगेवाड! हिमायतनगर प्रतिनिधी!

हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा, पळसपूर, सिरंजणी, एकंबा, दरेगाव तसेच परिसरातील इतर गावांच्या शिवारात मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटार पंप, केबल व विद्युत वायर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी एक गंभीर समस्या निर्माण झाली असून, नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्र यांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतातील विहीर व बोअरवेलमधील पाणी पिकांना देण्यासाठी वापरण्यात येणारे मोटार पंप, केबल व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांकडून चोरी केले जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एकीकडे शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना, बियाणे, खत व इतर कृषी साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी होरपळून निघत आहे. अशा परिस्थितीत चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीही पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस व मोठी कारवाई झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, चोरीस गेलेले साहित्य हिमायतनगर, किनवट व भोकर येथील काही भंगार दुकानांमध्ये विक्रीस जात असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे संबंधित भंगार दुकानांची कसून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
चोरीच्या घटनांवर तातडीने आळा घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पळसपूर येथील शेतकरी तुकाराम वानखेडे, कल्याण वानखेडे, सुनिल वानखेडे, अवधूत वानखेडे व गजानन वानखेडे यांनी दिला आहे.





















