माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
हिमायतनगर | नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची (अ.जा.) बैठक राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कार्यालय, नवा मोंढा नांदेड येथे सोमवारी पार पडली. या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष प्रा. मनोहर पवार यांनी,केले होते. नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्याचे पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वितरण करण्यासाठी या बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
हिमायतनगर तालुक्यातील मंगरुळ गावचे उपसरपंच तथा सोसायटी संचालक , काँग्रेस पक्षात मागच्या ७ वर्षापासुन सक्रीय असलेले युवा नेते संतोष लिंगोजी आंबेकर यांची हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटी (अ.जा) अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी माध्यमांशी बोलतांना आंबेकर म्हणाले कि, माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी विराजमान केल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे मनापासुन आभार व्यक्त करतो. माझे नेते तथा हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सन्माननिय माधवरावजी पाटील जवळगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या ७ वर्षापुर्वी एक साधा कार्यकर्ता म्हणुन मतदार संघात राजकिय कामाला सुरुवात केली. अल्पावधीतच गावाचा उपसरपंच आणि नंतर सोसायटी संचालक म्हणून निवडुन आलो. आता तर साहेबांनी तालुका काँग्रेस कमिटी (अ.जा.) तालुका अध्यक्ष पदाची धुरा माझ्या खांद्यावर दिली.
त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत.तसेच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी(अ.जा.) जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि माझ्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केला. त्याबद्दल त्यांच्या ही विश्वासाला खरे उतरण्याचा मी सदैव प्रयत्न करेल. आणि विषेश म्हणजे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी माझ्या भावी राजकीय वाटचालीला भरभरुन शुभेच्छा देणं माझ्यासाठी खुपच प्रेरणादाई आहे.
ते पुढे म्हणाले , मी हा इथपर्यंतचा प्रवास ज्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने पार करु शकलो ते माझे मंगरुळवासीय मतदार, तथा हिमायतनगर तालुक्यातील समाजबांधव, पक्षातील, चळवळीतील सहकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि माता भगिनी यांना मनापासून धन्यवाद देतो. आपणच माझी खरी ताकत आहात. त्यामुळे या जनशक्तीसमोर नम्रपणे नतमस्तक होतो. पक्षाची समतावादी, संविधानवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी विचारधारा जनमानसात रुजवण्यासाठी मी तत्पर असेल.
या बैठकिला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.आ.अमरनाथ राजुरकर, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा,जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,सभापती संजय देशमुख लहानकर, प्रा.रविंद्र पाटील चव्हाण,सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, जिल्हा सचिव बालाजीराव मुद्देवाड, मा.जि.प.सदस्य सुभाषदादा राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.तर ग्रा.पं.सदस्य बालाजीराव पावडे, विकास गाडेकर करंजीकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते हजर होते.
त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यात सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संतोष आंबेकर यांची तालुका अध्यक्षपदी झालेली नियुक्ती येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत हिमायतनगर तालुक्यात मोठी भुमिका बजावेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.