नवी दिल्ली दि.१२ फेब्रुवारी : भारत-अमेरिका व्यापार करारातील कथित शेतकरीविरोधी व जनविरोधी तरतुदींविरोधात संसद परिसरात विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार निषेध आंदोलन छेडले. मकर द्वार, संसद भवन येथे काँग्रेससह विविध विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकत्र येत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली.
या आंदोलनात खासदार प्रियांका गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ खासदारांची उपस्थिती होती. देशाच्या सार्वभौम हिताशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही अटी मान्य होणार नाहीत, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
खासदारांनी सांगितले की, प्रस्तावित करारातील काही तरतुदी शेतकरी, कामगार, लघुउद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला धक्का देणाऱ्या आहेत. परकीय दबाव किंवा मोजक्या कॉर्पोरेट समूहांच्या फायद्यासाठी देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्वायत्ततेशी खेळ करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसने मांडली.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी दिलेल्या ‘अखिल भारतीय बंद’च्या हाकेला काँग्रेसने उघड पाठिंबा जाहीर करत, “शेतकऱ्यांच्या लढ्यात आम्ही रस्त्यावरही आणि संसदेतही सोबत आहोत,” असा संदेश दिला.
काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की, देशहित, शेतकरीहित आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.













