विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षही भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचे नाव चर्चेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly Speakership) अर्ज करणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकरांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी नवीन विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे. नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांत मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज पाहिले. ठाकरे गट आणि शिंदे गटातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात नार्वेकर यांची निर्णायक भूमिका होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष असतील, अशी माहिती आहे. नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जातेय. ते रविवारी दुपारी बाराच्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. राहुल नार्वेकर याबाबत प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती जबाबदारी मी पार पाडेन. विधानसभा अध्यक्षपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. पक्षाने मला अनेक संधी दिल्या असून यापुढेही जी संधी दिली जाईल, त्यानुसार काम करेन. उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा दिवस आहे. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार ज्याला अर्ज भरण्यास सांगितले जाईल, त्याला अर्ज भरावा लागणार आहे.
दरम्यान, विधानसभेचे विशेष अधिवेशन शनिवारपासून सुरू झाले. शनिवार आणि रविवारी 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.