नांदेड,दि.१३: आपल्या भावाच्या खूनाचा बदला खून करूनच घेतल्याचा दुसरा प्रकार नांदेड शहरात दिवाळी पुजनाच्या दिवशी घडला आहे. नमस्कार चौक ते एमजीएम कॉलेज रस्त्यावरील नाथनगर पाटीजवळ तीन जणांनी एका युवकावर हल्ला करून त्याचा खून केला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहा महिन्यापुर्वी सचिन परमेश्र्वर शिंदे यास दिलीप पवार आणि त्याच्या साथीदारांनी नांदेड येथून नेऊन गाडीत त्याचा खून करून त्याचे प्रेत पोलीस ठाणे परळीच्या हद्दीतील जंगलात फेकुन दिले होते. त्याप्रकरणात दिलीप पवार हा अद्याप तुरूंगात आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-चार दिवसांपुर्वीच सचिन परमेश्र्वर शिंदेचा जन्मदिन होता. त्या दिवशी आपल्या भावाचा खून करणाऱ्यांचा बदला मी घेणार अशी चर्चा सचिन शिंदेच्या जन्मदिनी त्याचा भाऊ विश्र्वास परमेश्र्वर शिंदेने केली होती म्हणे. काल दि.12 नोव्हेंबरच्या रात्री सर्वत्र दिपोत्सव साजरा होत होता. घरो-घरी दिवाळीची पुजा सुरू असतांना रात्री 8.30 वाजेच्यासुमारास विश्र्वास परमेश्र्वर शिंदे आणि त्याचे इतर दोन साथीदार एका दुचाकीवर आले आणि त्यांनी भरत पवारचा खून केला. चाकूने भरत पवारच्या शरिरावर असंख्य वार झाले.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने, सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव, विमानतळ येथील गुन्हे शोध पथकाचे अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 375/2023 मध्ये विश्र्वास परमेश्र्वर पवार, त्यांची आई बेबाताई परमेश्र्वर पवार आणि दोन मित्र अशी नावे आरोपी सदरात लिहिली आहेत.
काही दिवसांपुर्वी नांदेड ग्रामीण पोलीसठाण्याच्या हद्दीत आपल्या वडीलांचा खून करणाऱ्या व्यक्तीचा खून दहा वर्षानंतर त्याच्या मुलांनी घेतला होता. परंतू सचिन परमेश्र्वर शिंदेच्या मृत्यूचा बदला विश्र्वास परमेश्र्वर शिंदेने जवळपास 6 महिन्यातच भरत पवारचा खून करून घेतला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मारेकरी विश्र्वास परमेश्र्वर शिंदेची आई बेबीताई हिला विमानतळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड