विजय पाटील | छ. संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर रुग्णाची आर्थिक लूट करत असल्यावरून शिंदे गटाचे आ. संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरला चांगलेच सुनावले. डॉ. आनंद निकाळजे आणि आ. बांगर यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या प्रकरणावरून आयएमए संघटनेने खरंतर एमजीएम प्रशासनाला जाब विचारण्याची गरज असताना, त्यांना सोईस्कर पाठिशी घालून आयएमएने चक्क आ. बांगर यांच्यावर आगपाखड केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कळमनुरी (जि. हिंगोली) मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे गोरगरीबांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात.
आजवर त्यांनी अनेकांची आर्थिक मदतही केली आहे. मात्र खासगी रुग्णालयांत होणाऱ्या लुटीला ते आक्षेप घेत असल्याने कायम डॉक्टरांच्या नापसंतीचे कारण ठरत आले आहेत. कळमनुरीतील १३ वर्षीय आदिती माणिकराव सरकटे या मुलीला डेंग्यू झाला होता. तिला छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने तब्बल तीन लाख रुपयांची औषधे मागवली. प्रकृती सुधारल्यानंतर रुग्णालयाने आणखी २ लाख ८५ हजार रुपयांचे बिल दिले. त्यातील १ लाख ८० हजार रुपये आधीच भरले गेले होते. मात्र त्यानंतर पुन्हा ८५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याने कुटुंबीय हतबल झाले. त्यांनी
. संतोष बांगर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लगेच रुग्णालयातील डॉक्टरांना कॉल करून फैलावर घेतले.
१० दिवसांत ६ लाख रुपयांचं बिल कसं काय? तुम्ही काय अमृत पाजलं रुग्णाला?, असे आ. बांगर यांनी सुनावले. डॉक्टरांनी रुग्ण मुलगी गंभीर स्थितीत होती. व्हेंटिलेटरवर होती, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आ. बांगर यांनी त्यांना सांगितले, की माझा भाऊ एमबीबीएस एमडी आहे. तुम्ही खोटं बोलू नका. एवढं मोठं हॉस्पिटल लोकांना लुटण्यासाठी बांधलं का? असा सवाल बांगर यांनी विचारला. गोरगरीबांना लुटू नका, हात जोडून विनंती करतो, असे बांगर म्हणाले. तुम्ही जर या पद्धतीने दवाखाना चालवणार असाल तर आम्हालाही ॲक्शन घेण्याचा अधिकार आहे, असा इशाराही बांगर यांनी दिला.
एमजीएमचा काय दावा…
डेंग्यूचे उपचार घेत असलेल्या आदितीवर ११ दिवस शर्थीचे प्रयत्न करत १० एप्रिलला डॉक्टरांनी मरणाच्या दारातून बाहेर काढले. याच दिवशी रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी जात असताना रुग्णाच्या नातेवाइकांनी एमजीएम रुग्णालयाच्या प्रशासनाशी वाद घालत लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दबाव आणत रुग्णालयाचे बिल न भरता रुग्णालय सोडले. यात संबंधित माहिती न घेता समाजमाध्यमांवर एमजीएम रुग्णालयासंदर्भात चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याचा दावा एमजीएमने केला आहे.
डॉक्टरांचा इशारा…
दरम्यान, आर्थिक लुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर एमजीएम रुग्णालयाचे आयसीयू तज्ज्ञ डॉ. आनंद निकाळजे यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले, की आमदारांच्या कॉलनंतर शिल्लक बिल न घेता सुटी देण्यात आली. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली डॉक्टरांना काम करावे लागत असेल, वेठीस धरले जात असेल तर याचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.
आयएमएने केले पाठराखण
एरवी रुग्णहितासाठी कार्यरत असल्याचा दावा करणाऱ्या आयएमएने या प्रकरणात एमजीएमची पाठराखण केली आहे. या संघटनेचे छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी एका दैनिकाशी बोलताना म्हटले, की रुग्णाच्या जीवासाठी डॉक्टर प्रामाणिकपणे लढत असतो. अपेक्षा करतो की सर्व स्तरांवरून डॉक्टरांना मोकळ्या आणि भयमुक्त वातावरणात काम करू द्यावे, असे ते म्हणाले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर