मुंबई दि.११ फेब्रुवारी:
बृहन्मुंबई महापालिकेच्या नवनियुक्त महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महापौर व उपमहापौर निवडीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबईच्या विकासाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी महापालिकेला योग्य दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करतील. या सभागृहाच्या गॅलरीत मी पहिल्यांदाच बसून कामकाज पाहिले. ऐतिहासिक वारसा असलेल्या या वास्तूमध्ये महत्त्वाच्या सोहळ्याचा साक्षीदार होणे अभिमानाची बाब आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याची आमची भूमिका आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. झोपडपट्टीमुक्त, खड्डेमुक्त रस्ते आणि प्रदूषणमुक्त मुंबई घडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबईला ‘फिनटेक कॅपिटल’ बनविण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन काम करेल.”
महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.












