नांदेड दि. १३ नोव्हेंबर :- किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड धबधबा येथे आज दुपारी पाण्याच्या प्रवाहात उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील ४ महिला व ३ मुले असे एकुण 7 जण अडकले होते.
नांदेड जिल्हा प्रशासनाने तात्काळ शोध व बचाव कार्य करुन त्या सर्वांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किनवट जेनिथ दोन्तुला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कु-हे यांच्या समन्वयातुन ही कार्यवाही करण्यात आली.
किनवट तालुक्यातील मौजे वाळकी इस्लापुर पोलीस स्टेशन हद्दीत सहस्त्रकुंड धबधबा येथे दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास ४ महिला व ३ मुले असे एकुण ७ जण सहस्त्रकुंड धबधबा पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे समजुन मुरळीतांडाकडे जात होते. त्यावेळी त्यांना मंदीराजवळील काही लोकांनी पाण्यात जाऊ नका असे सांगीतले पण त्यांनी आम्ही येथीलच असून नेहमी जात असतो असे सांगुन त्या महिला पाण्यात गेल्या परंतु पुढे जात असतांना पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्या पाण्यात अडकल्या व मदत मागण्यासाठी आरडा-ओरड करत होत्या. तेथील सुरज भर्दे व इतर युवक-नागरीकांनी लगेच या प्रसंगाबद्दल माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दुरध्वनीद्वारे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ वायरलेसवर पोलिसांना व तहसिलदार किनवट यांनाही कळविण्यात आले. तात्काळ शोध व बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जलसिंचन विभागाला सोडत असलेले पाणी बंद करण्यास सांगीतले तसेच शासनाकडे हेलीकॉफ्टरची मागणी बचाव कार्यासाठी केली.
स्थानीक शोध व बचाव पथकाद्वारे तेथील भोई समाजातील तडफदार युवकांनी तहसिलदार शारदा चौंडेकर व सपोनि उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य सुरु करून सात जणांची सुखरुप बचाव केला. दुपारी ३.१५ वाजता घटनेची माहिती व तात्काळ 2 तासात शोध व बचाव कार्य सायं. ५.१५ वा. यशस्वीरित्या पुर्ण केले.
यात अनुसयाबाई दिगंबर ताळमवार ४५ वर्ष, गजराबाई शिवाजी काठेवाड 45 वर्ष, सुवर्णा ज्योतीराम गांधरवाड ३२ वर्ष, पूजा दिगंबर ताळमवार १९ वर्ष, कोमल शिवाजी काठेवाड १७ वर्ष, कामिनी ज्योतीराम गांधरवाड 4 वर्ष, विघ्नेश ज्योतीराम गांधरवाड १ वर्ष हे सर्व राहणारे आहेत. यांना वाहत्या पाण्याच्या प्रवाहातुन धबधब्यातुन सुखरुप बाहेर काढण्यात आले.
तहसीलदार किनवट शारदा चोंडेकर, स.पोलिस निरीक्षक इसलापुर उमेश भोसले यांच्या प्रत्यक्ष सहभागातून मंडळ अधिकारी इस्लापूर सचिन भालेराव, गाडे जे.पी.दाऊद खान, पुष्पलवार, ग्राममहसुल अधिकारी अक्षय महाले, पोलिस पाटील वाळकी रवी खोकले, कोतवाल अमोल राठोड यांच्यासह स्थानिक शोध व बचाव कार्य पथक-भोई समाजातील रेस्क्यू करण्यात पांडुरंग जळबाजी नागीलवाड, दत्ता माधव चोपलवाड, अनिल शंकर भट्टेवार, रामराव सायबु घट्टलवार, दत्ता विठ्ठल विठ्ठलवार, सुनिल शंकर भट्टेवार यांनी सहभाग घेतला. तसेच सहस्त्रकुंड बानगंगा महादेव मंदीर ट्रस्टचे सचिव सतिश वाळकीकर यांनी मदत केली.
या शोध व बचाव कार्यबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातील महसूल सहायक बारकुजी मोरे व आयटी आसि. कोमल नागरगोजे हे संपर्क व समन्वय ठेवुन स्थानिक शोध, बचाव पथक व त्याबाबत अद्यावत माहिती सादर करत होते. हे शोध व बचाव कार्य स्थानिक प्रशासन, शोध व बचाव पथक, नागरीक, महसूल, पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांच्या समन्वयातुन यशस्वी झाले.












