मुंबई दि.८ फेब्रुवारी : केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने विविध स्तरांतून होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत एक अत्यंत महत्त्वाचे आणि सूचक विधान केले आहे. सावरकरांना हा पुरस्कार का दिला गेला नाही, या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी पुरस्काराच्या गरिमेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
मोहन भागवत यांचे नेमके वक्तव्य काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये एका विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ‘संघाच्या प्रवासाची १०० वर्षे आणि नवी क्षितिजे’ या विषयावर सरसंघचालक मोहन भागवत उपस्थितांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांना “स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अद्याप भारतरत्न पुरस्कार का देण्यात आला नाही?” असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “पुरस्कार देणाऱ्या निवड समितीमध्ये मी नाही, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार का मिळाला नाही, याचे कारण मला सांगता येणार नाही. मात्र, जर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन गौरवण्यात आले, तर त्या पुरस्काराचे महत्त्व आणि प्रतिष्ठा नक्कीच अधिक वाढेल.” त्यांच्या या विधानातून सावरकरांच्या कार्याचा गौरव आणि पुरस्काराची उंची या दोन्ही गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
शताब्दी महोत्सवानिमित्त मान्यवरांची मांदियाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित या दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, इतिहास आणि कार्याचा आढावा घेतला. या सोहळ्यासाठी व्यासपीठावर पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसीया, कोकण प्रांताचे संघचालक अर्जुन चांदेकर आणि मुंबई महानगराचे संघचालक सुरेश भगेरिया उपस्थित होते.
कला, साहित्य आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती या कार्यक्रमाला मुंबईतील विविध क्षेत्रांतील तब्बल ९०० हून अधिक प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यामध्ये विशेषतः बॉलीवूडमधील सेलिब्रिटींची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. अभिनेता सलमान खान याने या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. त्याच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, अभिनेता रणबीर कपूर, गायक अदनान सामी, गायिका अनुराधा पौडवाल, दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर आणि विपुल शहा यांसारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते.
तसेच, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये खासदार उज्ज्वल निकम, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
सरसंघचालकांच्या या विधानामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न पुरस्कार हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.












