मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कुटुंबातून एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि शरद पवार यांची नात, रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाला आहे. या बातमीमुळे पवार कुटुंबियांसह त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. रेवती सुळे या आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांचा जीवनसाथी कोण असणार, याबद्दल सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेवती सुळे यांचा विवाह नागपूर स्थित ‘सारंग अरुण लखानी’ यांच्याशी ठरला आहे. त्यामुळे आता रेवती सुळे या नागपूरच्या लखानी कुटुंबाच्या सूनबाई होणार आहेत. सारंग लखानी हे एक उद्योजक असून ते ‘विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर’ (Vishwaraj Infrastructure) या कंपनीचे संचालक (Director) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ते विश्वराज समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत.
विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे यांचे होणारे जावई सारंग लखानी हे केवळ उद्योजक नसून एक उत्तम खेळाडू देखील आहेत. त्यांनी बॅडमिंटन खेळात विशेष नैपुण्य मिळवले असून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांचे वडील अरुण लखानी हे क्रीडा क्षेत्राशी जवळून जोडलेले आहेत. ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
राजकीय वर्तुळातून समोर येत असलेल्या चर्चेनुसार, अरुण लखानी यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. असे म्हटले जात आहे की, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनेच हे लग्न जुळवण्यात आले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि रेवती यांच्या जवळच्या मैत्रीण, स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आनंदाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
रेवती सुळे यांच्याबद्दल सांगायचे तर, त्या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची कन्या आहेत. रेवती यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यावेळी त्या पहिल्यांदा राजकीय पटलावर सक्रिय दिसल्या होत्या. आता लवकरच त्या लखानी कुटुंबाची सून होणार आहेत.
“टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) आहे. फोटोच्या चांगल्या सादरीकरणासाठी (Presentation) आणि ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.”












