धाराशिव दि.१० फेब्रुवारी : लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्त्व असते, हे आपण अनेकदा ऐकतो. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचे मोल काय असू शकते, याचा प्रत्यय नुकताच धाराशिवमध्ये आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत अत्यंत अटीतटीचा आणि श्वास रोखून धरायला लावणारा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत एकाच मताने सत्तेचे गणित बदलले असून, ठाकरे गटाच्या उमेदवाराने निसटता पण अतिशय महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे.
ढोकी पंचायत समिती गणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमर समुद्रे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निहाल काझी यांच्यात सरळ आणि निकराची लढत झाली. मतमोजणी दरम्यान दोन्ही बाजूने उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अखेरच्या आकडेवारीनुसार, अमर समुद्रे यांना एकूण ३१८७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे निहाल काझी यांना ३१८६ मते पडली. दोन्ही उमेदवारांमधील मतांचे हे अंतर अवघ्या एका मताचे होते, ज्यामुळे हा विजय ऐतिहासिक आणि रोमांचक ठरला आहे.
निकाल जाहीर करण्यापूर्वी मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या एका मताचा फरक असल्याने पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी झाली. या फेरमोजणीतही अमर समुद्रे हेच आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तरीही निकाल जाहीर करण्यास विलंब होत असल्याने अमर समुद्रे यांनी प्रशासनावर राजकीय दबावाचा आरोप केला. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती की, मतमोजणी केंद्रावर चक्क वकिलांना पाचारण करावे लागले. वकिलांच्या युक्तिवादानंतर आणि कायदेशीर बाबी पडताळल्यानंतर प्रशासनाने अखेर अमर समुद्रे यांना एका मताने विजयी घोषित केले.
राज्यातील हा एकमेव असा निकाल ठरला जो जाहीर होण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वाट पाहावी लागली. निकाल अधिकृतपणे घोषित होताच, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मतमोजणी केंद्राबाहेर अमर समुद्रे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. “एका मताचे महत्त्व मी शब्दांत मांडू शकत नाही,” अशी भावनिक प्रतिक्रिया विजयानंतर अमर समुद्रे यांनी व्यक्त केली. या विजयामुळे भाजपला जोरदार धक्का बसला असून, ठाकरे गटाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे.












