👉🏻दुधड- वाळकेवाडी येथील ग्रामस्थांचा इशारा….
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील दुधड- वाळकेवाडी सह किनवट, भोकर, हदगाव उपविभागीय कार्यालय क्षेत्रातील आदिवासी बांधवांचे वनहक्क दावे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनहक्क दावे तात्काळ वाटप करण्यात यावे अन्यथा आदिवासी बांधवांच्यावतीने दि 17 फेब्रुवारी पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी बांधवांकडून एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव, भोकर, किनवट अंतर्गत कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांचे वनहक्क दावे प्रलंबित असून ह्या संदर्भात वारंवार निवेदने देण्यात आले आहे. परंतु आजपर्यंत या क्षेत्रातील आदिवासी बांधवांचे वनहक्क दावे मंजूर करून देण्यात आलेले नाही. तसेच मागील एक- दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या हस्ते १५ वनहक्क दावे वाटप करण्यात आले होते. परंतु वनहक्क दावे वाटप झाले तरी, आदिवासी बांधवांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुरावे दाखवून सुद्धा अपात्र करणे, जुन्या पुराव्याला अजुन एक पुरावा जोडणे, ७/१२ वाटप केले होते. पण ८/अ दिला नाही जमीन पेरणी चांगली असताना पोट खराब मध्ये दाखवणे बैंक लोन देण्यास टाळाटाळ करणे, जिल्हा समितीने दावे मंजूर करुन सुद्धा ७/१२ वनहक्क प्रमाणपत्र न मिळणे, बिरसा मुंडा विहीरी व इतर योजना असुन सुद्धा योजनेचा लाभ न मिळणे, जिल्हा समितीत दावे मंजूर, पण सहायक संरक्षकाच्या सह्या प्रलंबित म्हणून टाळाटाळ करणे, अशा समस्या निर्माण होत आहे. तसेच हदगाव, भोकर, किनवट उपविभागीय कार्यालय अंतर्गत राहीलेले आदिवासी बांधवांचे बनहक्क दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी ह्या बाबी कडे तात्काळ लक्ष देवून वनहक्क दावे देण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत कार्यालय दुधड/ वाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे













