सोलापूर दि.७ फेब्रुवारी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, वातावरण अधिकच गरम झाले आहे. अशातच आता भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्या विधानांचा समाचार घेताना, ‘मी अशा फालतू माणसासोबत बरोबरी करत नाही आणि त्यांना कवडीचीही किंमत देत नाही,’ अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधकांकडून काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स व्हायरल करण्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर भाष्य करताना राजन पाटील यांनी विरोधकांना खुले आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, जर विरोधकांकडे आमचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ असतील, तर त्यांनी ते खुशाल व्हायरल करावेत. व्हिडिओ बाहेर आले म्हणून आम्ही काय घाबरून अमेरिकेला पळून जाणार नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि आम्ही इथेच राहून सर्व परिस्थितीला सामोरे जाऊ. जर व्हिडिओ खोटे असतील तर त्यांनी कायदेशीर मार्गाने गुन्हे दाखल करावेत, पण निवडणुकीच्या काळात असले प्रकार करून मतदारांची दिशाभूल करू नये.
उमेश पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका करताना राजन पाटील पुढे म्हणाले की, “माझी लढाई ही उमेश पाटील यांच्याशी नाहीच. ते राजकारणात फार छोटे (बारके) आहेत आणि उगाचच स्वतःची उंची वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या घराण्याला तीन पिढ्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा आहे. आम्ही कधीही सत्तेसाठी लाचार झालो नाही. आमची लढाई ही तत्त्वांची आणि विचारांची आहे, एखाद्या व्यक्तीविरोधात नाही. जे उमेदवार माझ्यासोबत उभे आहेत, ते माझ्या मुलासारखे आहेत आणि त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे.”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करून मते मागितली जात असल्याचा आरोपही राजन पाटील यांनी केला. ते म्हणाले की, “अजितदादांबद्दल आमच्याही मनात नितांत आदर आहे आणि तो कायम राहील. परंतु, केवळ त्यांच्या नावाचे भांडवल करून जर कोणी मते मागत असेल, तर जनता त्या भावनिक आवाहनाला बळी पडणार नाही. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. तालुक्यात त्यांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नसल्याने, आता केवळ भावनिक मुद्दे पुढे करून ते जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मतदार सुज्ञ आहेत आणि ते अशा भूलथापांना बळी पडणार नाहीत.”
आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना राजन पाटील यांनी स्पष्ट केले की, देशाला आणि राज्याला केवळ भाजपच न्याय देऊ शकतो. शहराप्रमाणेच ग्रामीण भागाचा विकास करण्याची क्षमता फक्त भाजपमध्येच आहे. त्यामुळे येत्या काळात ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल आणि कमळ चिन्हावर उभे असलेले आमचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.













