प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध ;१० व ११ तसेच १७ व १८ ऑगस्टला नोंदणीची अखेरची संधी. ३० ऑगस्टला विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी जाहीर होणार
नांदेड, दि. ६ : नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी तयार झाली आहे. राजकीय पक्षापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रारूप यादी सर्वांसाठी खुल्या असून नागरिकांनी आपआपल्या नावाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदान यादीमध्ये नाही, मयत, मृतकांची नावे आहेत, अशा तक्रारी वारंवार करण्यात येतात.मात्र मतदानाच्या पूर्वी निवडणूक विभागामार्फत ज्या मतदान याद्या तयार होतात, त्याबाबत सामान्य नागरिकांनी राजकीय पक्षांनी जागरूकपणे लक्ष वेधणे आवश्यक आहे,अशी सूचना प्रशासनाने केली आहे. याबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ६ ऑगस्ट २०२४ मंगळवार ते २० ऑगस्ट २०२४ मंगळवारच्या दरम्यान असणार आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मतदार नोंदणी संदर्भातील प्रारूप याद्यांची माहिती आज प्रकाशित आली आहे. राजकीय पक्षाच्याही बैठकही वेळोवेळी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रारूप तपासून यामधील नावे वगळणे , नव्याने समाविष्ट करणे, मतदान केंद्र व त्याची माहिती करून घेणे सर्व शक्य आहे. यासाठी मतदार व राजकीय पक्षांनी लक्ष वेधणे आवश्यक आहे.
या ठिकाणी बघा प्रारूप याद्या
नांदेड जिल्ह्यातील ८३ -किनवट, ८४ – हदगाव, ८५-भोकर, ८६-नांदेड उत्तर ,८७- नांदेड दक्षिण, ८८-लोहा, ८९ -नायगाव, ९०- देगलूर व ९१-मुखेड या मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, तसेच सहाय्यक नोंदणी अधिकारी तहसीलदार यांचे कार्यालय व सर्व पदनिर्देशित ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सहा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध भारत निवडणूक आयोगाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.
२० ऑगस्टपूर्वी आक्षेप नोंदवा
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जुलै २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सुरू झाला असून त्या अंतर्गत ही दुसरी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यासंदर्भात कोणाला आक्षेप असल्यास २० ऑगस्ट पूर्वी राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिक आपला अर्ज दाखल करू शकतात.
शनिवार, रविवारी मतदान केंद्रावर अर्ज करा
ज्यांची नावे मतदान यादीमध्ये नाही त्यांनी दिनांक १० व ११ऑगस्ट तसेच १७ व १८ ऑगस्ट या शनिवार रविवारी येणाऱ्या दिवसाला आपले अर्ज भरून द्यावेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियमित जे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिक या ठिकाणी यादीमध्ये आपली नावे समाविष्ट करू शकतात. जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी मतदार अर्ज स्वीकारले जाणार आहे.
फॉर्म ६, ७, ८ भरण्याची सुविधा
फॉर्म ६ भरून नव्याने मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करता येते. फॉर्म ७ भरून यादीतून नाव वगळता येते. फॉर्म क्रमांक८ भरून मतदार यादीतील नावाची दुरुस्ती व अन्य बाबी करता येतात. २० ऑगस्ट रोजी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपणार आहे. त्यानंतर सर्व अर्जाची तपासणी होऊन पुन्हा ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाणार आहे. या मतदार यादीच्या आधारेच आगामी विधानसभा निवडणुकीचे मतदान घेण्यात येणार आहे.
केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला सहकार्य करा
मृत (मयत ) मतदारांची नावे वगळण्यासाठी मयताच्या कुटुंबातील सदस्यांनी फॉर्म नंबर सात भरून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गावातील ग्रामसेवक यांनी जन्म मृत्यू नोंदवही प्रमाणे मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना जन्म मृत्यू नोंदवहीची प्रमाणित प्रत उपलब्ध करून दयावी.जन्म मृत्यू नोंदवहीमध्ये एखाद्या मयत मतदाराची नोंद नसल्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी स्थानिक चौकशी व पंचनामा करून मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही या विशेष मोहिमे दरम्यान करावयाची आहे. त्यासाठी संबंधित गावातील सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करावयाचे आहे. या संदर्भात कोणीही हयगय करू नये, केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामसेवक यांनी यातील आपली जबाबदारी ओळखावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड












