नांदेड दि.२३ जानेवारी :
भारतीय जनता पार्टीकडून स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. सान्वी जेठवाणी यांचा विचार व्हावा, अशी जोरदार मागणी नांदेडमधील विविध कलावंत, सिंधी समुदाय तसेच अनेक समाजसेवी संस्था व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
डॉ. सान्वी जेठवाणी या उच्चशिक्षित तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या, नामवंत कलावंत व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्र शासनाने स्वीकृत सदस्य पदासाठी निश्चित केलेले सर्व निकष त्या पूर्ण करीत असून त्यामुळे त्यांचा योग्य विचार व्हावा, असे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
समाजसेवेच्या माध्यमातून डॉ. जेठवाणी यांनी युवकांना सोबत घेऊन रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण मोहिमा, आरोग्य व संवेदनशीलता जनजागृती कार्यक्रम राबवले आहेत. तृतीयपंथी समुदायासाठी शिक्षण, रोजगार, सन्मान व अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी सातत्याने भरीव कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कलावंत म्हणून त्यांनी नांदेडसह राज्य व देशपातळीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून अनेक प्रभागांमध्ये फिरून जोरदार प्रचार-प्रसार करत पक्षासाठी मेहनत घेतली.
डॉ. सान्वी जेठवाणी यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिल्यास, केवळ एक सक्षम व संवेदनशील नेतृत्व पुढे येणार नाही, तर तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात स्थान देण्याचा सकारात्मक व प्रेरणादायी संदेश समाजाला मिळेल, अशी भावना नांदेडमधील कलावंत, सिंधी समुदाय आणि समाजसेवी वर्गातून व्यक्त होत आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!












