शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
हिमायतनगर : तालुक्यातील मौजे मंगरूळ गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. येथे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. शाळेतील एकुण विद्यार्थी संख्या १२५ एवढी आहे परंतु शिक्षक मात्र फक्त ४ आहेत. सात वर्गाला ४ शिक्षक शिकवतात परंतु शिक्षकांना पाहिजे तेवढा वेळ सर्व वर्गात देता येणे अशक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही व याचा त्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे पालक सुद्धा यामुळे त्रस्त आहेत.काही पालक तर “शाळेत शिक्षक नाहीत तर तु शाळेत जाऊन काय करणार यापेक्षा आमच्यासोबत शेतात कामाला चल” असे म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवता शेतात घेऊन जात आहेत. यामुळे शाळागळतीचे प्रमाण वाढत आहे व भविष्यात आपल्या राज्याचे साक्षरतेचे प्रमाण कमी होण्याचा धोका आहे . जी खुपच गंभीर बाब आहे. परंतु शिक्षण विभाग याकडे कानाडोळा करत आहे असा आरोप काँग्रेस पक्ष करत आहे.
ही बाब गांभीर्याने घेत शिक्षण विभागाने त्वरित २ शिक्षकांची नेमणूक करावी अन्यथा सदरील विषयास न्याय देण्यासाठी आम्हाला संविधानिक मार्गाने पूढील भुमिका घ्यावी लागेल असा इशारा मंगरूळचे उपसरपंच तथा उप-जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमीटी (अ.जा.विभाग) यांनी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा परिषद नांदेड यांना भेटुन निवेदनाद्वारे दिला आहे.