सांगली दि.२ फेब्रुवारी. : सांगली शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. सांगलीतील मध्यवर्ती आणि सतत गजबजलेल्या टिळक चौक परिसरात रविवारी रात्री एका मद्यधुंद कार चालकाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या बेजबाबदार चालकाने आपल्या भरधाव गाडीने रस्त्यावरील अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल १४ ते १५ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताची व्याप्ती इतकी मोठी होती की, जखमींमध्ये कर्तव्यावर असलेल्या ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. मद्यप्राशन केलेल्या या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने गर्दीत घुसून समोर येईल त्याला उडवले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संतापलेल्या नागरिकांनी कार चालकाला जागीच पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असली, तरीही डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्वांवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.












