नांदेड दि२६ जून: नांदेड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १६ मधील नागरिकांना गेल्या सहा वर्षांपासून भेडसावत असलेल्या घरपोच कचरा संकलनाच्या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे. डॉ. कैलाश भानुदास यादव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळत वॉर्डात घरगुती कचरा संकलनासाठी हातगाड्या (हातरिक्षा) पुन्हा सुरू करण्यात आल्या. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून परिसरातील स्वच्छता व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घरपोच कचरा संकलन सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाची दखल घेत प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी नांदेड महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत अखेर घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी उपमहापौर श्री. दीपकसिंह रावत, नगरसेवक श्री. तुळजाराम यादव, नगरसेविका सौ. अमृताबाई ठाकूर आणि नगरसेविका सौ. रुची भारतीया यांच्या प्रमुख मार्गदर्शनामुळे वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घरगुती कचरा संकलनासाठी हातगाड्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाला अधिक प्रभावी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गोकुळ यादव यांनी संपूर्ण वॉर्डातील विविध रस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करूनच कचरा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण केल्यास स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम होऊन पर्यावरण संवर्धनालाही मोठी मदत होईल, अशी माहिती त्यांनी नागरिकांना दिली.
घरपोच कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. विशेषतः नांदेड महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, संबंधित विभागाचे अधिकारी, उपमहापौर श्री. दीपकसिंह रावत, नगरसेवक श्री. तुळजाराम यादव, सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे डॉ. कैलाश भानुदास यादव तसेच जनजागृती मोहीम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ यादव यांच्या प्रयत्नांचे नागरिकांनी कौतुक केले.
वॉर्ड क्रमांक १६ मध्ये सहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या या घरपोच कचरा संकलन सेवेमुळे परिसरातील स्वच्छता व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून “स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड” या संकल्पनेच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.





















