नायगाव दि.१७: नोकरीसाठी घरून पुण्याकडे निघालेल्या मांडणी येथील तिरुपती ऊर्फ किरण लांडगे या तरुणाने बेरोजगारी व आरक्षणामुळे शनिवारी (ता.१५) रात्री येळी महाटी येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सदर तरुणाचा मृतदेह रविवारी (ता.१६) मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याची माहिती मिळाली.
तालुक्यातील मांडणी येथील उच्चशिक्षित तरुण तिरुपती ऊर्फ किरण लांडगे (वय २५) यास अनेक महिन्यांपासून नोकरी मिळत नव्हती. सरकारी नोकरीची जाहिरात नसल्याने तो उद्विगन होता. नोकरी नसल्याने घरातही वडील रागराग करत होते. दरम्यान, शनिवारी (ता.१५)वडिलांनी कुठेतरी काम कर असे सांगितले. त्यामुळे तिरुपतीने मी पुण्यात कामाला जातो असे सांगितले. मुलगा पुण्याला कामासाठी जातो म्हटल्याने वडिलांनीच खर्चासाठी पैसे दिले होते.
वडिलांनी दिलेले पैसे, शैक्षणिक कागदपत्रे आणि कपडे घेऊन तो पुण्याला जाण्यासाठी शनिवारी (ता.१५) रात्री ८ वाजेच्या दरम्यान मांडणी येथून निघाला. मात्र, पुण्याला न जाता तो येळी महाटी येथील पुलावर आला.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
समाजाला आरक्षण मिळण्यास दिरंगाई होत आहे, शासन जागा भरत नाही, जाहिरात काढली तर भरती करून घेत नाही आणि केलीच भरती तर नियुक्तिपत्र देत नाही अशी चिठ्ठी लिहून त्याने पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारली.
सदर माहिती मांडणी येथे समजल्यावर ग्रामस्थांनी येळी महाटीच्या पुलाकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली पण शोध लागला नाही. रविवारी (ता.१६) त्याचा मृतदेह मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडला. याप्रकरणी मुदखेड पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













