विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि.१२: चोऱ्या, लुटमारीसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यामुळे जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या अट्टल गुन्हेगाराने पुन्हा शहरात येत पिस्तुल घेऊन फिरायला सुरुवात केली. पोलिसांना हे कळताच सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि जीवंत काडतुसे जप्त केली आहेत. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) शहरातील प्रतापनगरमध्ये ही कारवाई शहर गुन्हे शाखेने केली.
गणेश शंकर पिंपळे (रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी, वेदांतनगर, अहिल्यानगर, नाशिक पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे २० फेब्रुवारी २०२४ रोजी त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तरीही तो शहरात पिस्तूल घेऊन फिरत होता. ही माहिती शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, अंमलदार प्रकाश गायकवाड, अमोल शिंदे, मनोहर गिते, अमोल मुगळे यांच्या पथकाने प्रतापनगरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मिळून आलेली दोन्ही पिस्तूल मध्य प्रदेशमधून आणल्याची कबुली त्याने दिली. त्याला उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!