पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड दि.२९: जुना मोंढा येथील ऐतिहासिक टॉवरवरील घड्याळ बसविण्याची प्रक्रिया नांदेड वाघाळा महापालिकेने सुरु केली असून त्यासाठी संबंधित ठेकेदारांकडून लवकरच निविदा दरपत्रके मागविण्यात येणार असल्याची माहिती आहे. पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी ही घड्याळ बसविण्यासाठी मनपा नांदेडसह थेट मंत्रालयात धडक मारली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
नांदेड शहरातील जुना मोंढा भागात शहराचे वैभव असलेल्या टॉवरवरील घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. मनपा उद्यान विभागाने २०१८ मध्ये नवीन घडी बसविली होती. परंतु ती बंद बडली. तेव्हापासून घड्याळ्याचे काटे स्थिर आहेत. ही घडी बसविण्यात यावी व शहराचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी गेल्या काही दिवसांपासून स्थानिक मनपा प्रशासनासह नगरविकास मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर करून याकडे लक्ष्य वेधले होते. वागदरीकर यांच्या निवेदनाची दखल घेऊन मनपा आयुक्तांनी नांदेड-वाघाळा महापालिका उद्यान अधिक्षकांना नवीन घड्याळ बसविण्यासाठी आवश्यक त्या निविदा दरपत्रके मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे टॉवरवरील घड्याळ बसविण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली असून पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.
