विजय पाटील
कन्नड दि.९ :डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीची हत्या केल्याची घटना रोहिला खुर्द (ता. कन्नड) येथे शुक्रवारी (८ नोव्हेंबर) पहाटे तीनच्या सुमारास घडली. नुरलीबाई बद्री देवरे (वय २६) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे, तर बद्री गेदिया देवरे (वय २९) असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. हे दाम्पत्य मध्यप्रदेशातील गुरचाल (ता. सेंधवा, जि.बडवाणी) येथून रोहिला खुर्द येथील संदीप गोरख शेलार यांच्या शेतात कामासाठी आले होते. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बद्री हा पत्नी नुरलीबाई, मुलगा व मामी शेलकी डावरसह यांच्यासह शेतातील गोडाऊनमध्ये राहत होता. गुरुवारी (७ नोव्हेंबर) सायंकाळी बद्री व नुरलीबाई यांच्यात घरगुती कारणावरून जोरदार भांडण झाले. शेतमालक शेलार यांनी भांडण मिटवून दोघांना समजावून सांगितले. यावेळी नुरलीबाईने मला नवरा मारहाण करतो, मला येथे राहायचे नाही, असे सांगितले. मात्र शेलार यांनी समजावून सांगितल्यानंतर ती शांत झाली. शेलार गेल्यानंतर पती-पत्नीतील भांडण रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
शुक्रवारी पहाटे तीनला जोरजोरात आरडाओरड व रडण्याचा आवाज आल्याने शेतमालक शेलार धावून गेले असता बद्री हातात कुन्हाड घेऊन पळून जाताना त्यांना दिसला. गोडाऊनमध्ये नुरलीबाई रक्ताच्या थारोळ्यात तडफडताना दिसली. मामी शेलकी डवरी यांनी बद्रीने तिच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्याचे सांगितले. शेलार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने नुरलीबाईला ट्रॅक्टर ट्रॉलीने गावात व नंतर बोलेरो वाहनाने कन्नडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले.
मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. देवगाव रंगारी पोलिसांनी युद्धपातळीवर बद्रीचा शोध घेऊन त्याला काही तासांतच परिसरातूनच त्याला अटक केली. ३ दिवसांपूर्वी ५ नोव्हेंबरलाच हे कुटुंब शेलार यांच्या शेतात कामाला आले होते. मात्र आल्यापासून त्यांच्यात भांडणे होत होती. नुरलीबाईला बद्रीसोबत राहायचे नव्हते. त्यातून कडाक्याचे भांडण होऊन रागाच्या भरात बद्रीने नुरलीबाईच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले आणि तिला यमसदनी पाठवले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!