विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.९ : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. स्वामी यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतिपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्यासह सर्व आरोग्य यंत्रणांचे प्रमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपस्थित होते. मतदान केंद्रांवर द्यावयाच्या वैद्यकीय सुविधांबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांची माहिती या वेळी देण्यात आली. त्यात प्रामुख्याने द्यावयाचे मेडिकल किट ज्यात प्राथमिक उपचारासाठीचे साहित्य व औषधींचा समावेश आहे. अचानक उद्भवणाऱ्या आजारांबाबत प्राथमिक औषधांचा समावेश आहे. प्रत्येक क्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकात एक आरोग्य कर्मचारी असावा, असेही निर्देश असल्याचे सांगण्यात आले. त्यादृष्टीने जिल्ह्यातील ९ मतदारसंघांमध्ये आरोग्य सुविधा देण्याबाबत मतदान केंद्रनिहाय तसेच मतदान कर्मचारी यांचे साहित्य वितरण ठिकाण तसेच मतमोजणीच्या ठिकाणी वैद्यकीय कक्ष तयार करण्याबाबत निर्देश देण्यात आले. यासोबतच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अन्य रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड सहित उपचार सुविधांसाठी सज्जता ठेवण्यात यावी. जेणेकरून निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यास काही वैद्यकीय समस्या उद्भवल्यास तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध व्हावी, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्देश दिले. त्यासाठी अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
			












