विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि.२८: छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंदाच्या भरात एमआयएम कार्यालय ते जलील यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढणाऱ्या एमआयएमच्या ३० पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी त्यांनी मिरवणूक काढल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
मोहम्मद नदीम, समीर बिल्डर, रहीम पटेल, अश्पाक शेख, अरुण बोर्डे, मुन्शी पटेल, सोहेब पठाण यांच्यासह २५ ते ३० जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांत समावेश आहे. जलील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर २६ ऑक्टोबरला रात्री बाराच्या सुमारास बुढ्ढीलेन येथील एमआयएम कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर एमआयएम कार्यालयापासून जलील यांच्या घरापर्यंत वाहन रॅली काढली. सध्या आचारसंहितेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. तरीही जमाव जमवून जल्लोष केला, मिरवणूक काढली. यामुळे आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन झाले. पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शाकीर शेख करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज.# छत्रपती संभाजी नगर