नांदेड दि.३: दिव्यांग व्यक्तिमध्ये सामान्य व्यक्ती पेक्षा वेगळी शक्ती असून त्याच्याकडे पाहून जगण्याची ऊर्जा व स्फूर्ती मिळते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले. यावेळी त्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील केले आहे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्गत जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ३ फेब्रुवारी रोजी पोलीस कवायत मैदानात दिव्यांगाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार,समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे,बापू दासरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत दिव्यांगाच्या अस्थिव्यंग, मतिमंद, मूकबधिर, अंध प्रवर्गातील ७० शाळेतील जवळपास साडे सातशे मुले व मुली सहभागी झाले होते. प्रथमता हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिव्यांग मुलांच्या हस्ते मशाल पेटवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी बोधडी येथील अंध विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे गीत गाऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व कर्मचारी यांच्या विविध समित्या स्थापन केल्या असून वै. सा. का. कैलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मुला- मुलीच्या निवासाची व भोजनाची चोख व्यवस्था बजावण्यात आली होती. दि.४ फेब्रुवारी रोजी दहा वाजता दिव्यांग विदयार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कुसुमताई चव्हाण सभागृहात करण्यात आले आहे.
चौकट
विकलांगाच्या उन्नतीसाठी तंत्र ज्ञानाचा वापर करावा-दलजीत कौर जज आज काल तंत्रज्ञान दिवासोंदिवस प्रगत होत असून विकलांग मुले मुली जन्मास येऊ नये यासाठी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी व विकलांग विद्यार्थ्यांच्या उन्नती साठी पालकांनी व शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव
श्रीमती दलजीत कौर जज यांनी दिव्यांग मुलामुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड