Nepal Earthquake : नेपाळमध्ये आज (4 एप्रिल, 2025) संध्याकाळी 7:52 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल इतकी होती. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. सध्या या भूकंपामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, उत्तर भारतातही या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, भूकंप 20 किमी खोलीवर झाला आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ हे भूकंपाचे केंद्र होते.
नेपाळ हा जगातील सर्वात सक्रिय भूकंपप्रवण प्रदेशांपैकी एक आहे, जेथे भूकंपाचा धोका कायम आहे. शुक्रवारी (28 मार्च 2025) म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये शक्तिशाली भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला. त्या दिवशी सकाळी नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्याचे धक्के बिहार, सिलीगुडी आणि भारताच्या इतर शेजारच्या भागात जाणवले.
म्यानमारमध्ये भूकंप होण्यापूर्वी, त्याच दिवशी, भारत आणि तिबेटच्या सीमावर्ती भागातील रहिवाशांनीही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले. भूकंपामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये निर्माणाधीन एक बहुमजली इमारत कोसळली, तर म्यानमारमधील लाखो लोक बेघर झाले. भारत सरकारने म्यानमारमधील भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी एक मिशन सुरु केले, ज्याला ऑपरेशन ब्रह्मा असे नाव देण्यात आले. भूकंपामुळे नष्ट झालेल्या पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक स्थळांच्या पुनर्बांधणीसाठी भारत म्यानमारला मदत करणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी (3 एप्रिल 2025) भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.6 इतकी मोजली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या या जिल्ह्यातील सांगोलाजवळ पाच किलोमीटर खोलीवर होता. गेल्याच आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे मोठे धक्के बसल्याने बँकॉकसह शेजारील देशांचं मोठं नुकसान झालं आहे. उंचच उंच इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्याचं दिसून आलं. या दुर्घटनेत मोठी वित्तहानी व जीवितहानी झाली होती, हजारांपेक्षा अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेचे व्हिडिओ देखील मनाला चटका देणारे आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असतात. येथील कोयना परिसरात भूकंपाचे केंद्र असते, सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी येथील परिसर काहीसा हादरुन जातो. मात्र, या भूकंपामुळे लातूर भूकंरपाच्या आठवणी ताज्या होतात. सोलापूर जिल्ह्यातील आजच्या भूकंपानंतरही काहींनी लातूरमधील भूकंपाच्या आठवणी ताज्या केल्याचं दिसून आलं.