नांदेड दि.२१: यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे २० फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित “राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी स्पर्धा – नवकल्पनात्मक संकल्पना” (NSCII-25) मध्ये इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेडच्या फार्म.डी. (Pharm D) च्या विद्यार्थी शेख समीर शेख फरीद यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
शेख समीर यांनी ” कॅक्टस म्युसिलेजपासून बायोप्लास्टिकचा विकास – एक अभिनव संशोधन प्रकल्प” या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. त्यांचे मार्गदर्शन इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. पल्लवी कांबळे यांनी केले. या संशोधनातून कॅक्टस वनस्पतीतील नैसर्गिक चिकट पदार्थ वापरून बायोडिग्रेडेबल प्लास्टिक तयार करण्याच्या संधींचे अध्ययन करण्यात आले.
ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रधानमंत्री उन्नत शिक्षा अभियान (PM-USHA) अंतर्गत प्रायोजित होती. स्पर्धेत चार प्रमुख विभाग होते मानव्यशास्त्र, प्युअर सायन्स, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान. एकूण १३० विद्यार्थ्यांनी विविध नवकल्पनात्मक संकल्पनांसह सहभाग घेतला. इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या १० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला.
सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधनक्षमतेचे कौतुक केले आणि अशा नवकल्पनात्मक संशोधन उपक्रमांना अधिक चालना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. नवघरे तसेच डॉ. गिरगावकर उपस्थित होते.
शेख समीर यांना मिळालेल्या यशाबद्दल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, महाविद्यालयाचे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि सहविद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड